कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाशेजारी पानपट्टीच्या आडोशाला मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर कुपवाड पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत रंगेहाथ पकडून तीन जुगारडयांना अटक करण्यात आली.यामध्ये संशयित अजय कुबेर लोखंडे (२९,रा.हनुमाननगर, कुपवाड), उत्तम परगोंडा कोरे (६१, रा.मिरज एमआयडीसी) व शामगोंडा बबन पाटील (४२,रा,शांत कॉलनी, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील जुगार अड्ड्यावरील रोख रक्कम ३ हजार १०० रुपये, तीन मोबाईल, मोटारसायकल मिळून ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड एमआयडीसीत मुख्य रस्त्यालगत सोमवारी रात्री एका पेट्रोल पंपाजवळ पानपट्टीच्या आडोशाला मोकळ्या जागेत काहीजण पैसे लावून तीनपानी जुगार बसल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकुन तिघांना तीनपानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जुगार अड्ड्यावरील रोख रक्कम, तीन मोबाईल, मोटारसायकल (एम.एच.१० ए.जे. — ७९४१) असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.