उचगाव /वार्ताहर
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार असलेल्या रोहित बाळासाहेब पाटील (वय २७ रा. गडमुडशिंगीपैकी कुरलेवाडी) या तरुणाने गडमुडशिंगीमधील वनखात्याच्या जंगलातील एका झाडावर गळफास घेऊन मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. कोरोना काळात कामाची मंदी असल्याने तो त्रस्त होता.
रोहित पाटील सकाळी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. एका फीरस्त्याला दुपारी गडमुडशिंगी वनक्षेत्रातील एका झाडावर तो गळफासासह लटकलेला दिसला. त्याने रोहितचा भाऊ प्रशांत याला याबाबत कळवले. प्रशांतने घटनास्थळी जाऊन पाहिले असता गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. या प्रकाराची माहिती त्याने आपला चुलत भाऊ आनंदा रामू पाटील (रा. गडमुडशिंगीपैकी कुरलेवाडी) यांना दिली. आनंदा पाटील यांनी याबाबतची वर्दी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून रोहितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठविला. याबाबत नोंद करण्याचे काम गांधीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.