कुरुंदवाड/प्रतिनिधी
कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील पोटनिवडणुकीत चुरशीने झालेल्या मतदानात प्राजक्ता प्रफुल पाटील विजयी झाल्या. पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता भबिरे यांना 32 मतांनी पराभूत केले. प्राजक्ता पाटील यांना 911 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता भबिरे यांना 879 मते मिळाली. तर नोटाला 18 मते मिळाली. प्राजक्ता पाटील यांच्या विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.
कुरुंदवाड नगरपालिका सभागृहात आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये एकूण तीन मतदान केंद्रे होती. प्रत्येक केंद्राला एक मतमोजणीची फेरी याप्रमाणे एकूण तीन करण्यात आल्या.
पहिल्या फेरीत एकूण 598 मते होती त्यामध्ये पाटील यांना 350 मते तर, भबिरे यांना 242 मते मिळाली, दुसऱ्या फेरीत 595 मतदानातील 351 मते भबिरे यांना तर, 240 मते पाटील यांना मिळाली. दुसऱ्या फेरी अखेर भबिरे यांनी तीन मतांची आघाडी घेतली होती. तिसरी फेरी निर्णायक ठरली यामध्ये प्राजक्ता पाटील यांना 321 मते तर भबिरे यांना 286 मते मिळाल्याने प्राजक्ता पाटील या 32 मतांनी निवडून आल्याची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी घोषित केले.
विजयानंतर प्राजक्ता पाटील यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सर्व सामान्य मतदारांचा हा विजय असून या पुढे मी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.