प्रतिनिधी / कुरुंदवाड
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा येथील भारतीय जनता पार्टी व शहर कृती समितीच्यावतीने कुरुंदवाड येथील शिवाजी पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला राऊत यांचे गाढवावर बसलेल्या पोस्टरला जोडे मारून दहन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते रामचंद्र डांगे म्हणाले की, उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्याकडे पुरावे मागणे हे निंदनीय आहे. संजय राऊत यांची स्मृती भ्रष्ट झाली असल्याने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. यावेळी सिताराम भोसले, दयानंद मालवेकर, महीपती बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी भारतीय जनता पक्ष व शहर कृती समितीच्यावतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.
यावेळी संजय राऊत यांचा व महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यास गेलेले राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील–यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या वर्तणुकीचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, अविनाश मुंगसे, युवराज खरात यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.
यावेळी नगरसेवक उदय डांगे, महेश निकम, सचिन भोसले, आयुब पठाण, चांद कुरणे, राजेंद्र फल्ले, राजू पाटील, बाळासाहेब बेले, केदार पाटुकले, नंदू पाटील, ओंकार माळी, चेतन चौगुले, अनिल शिकलगार, यासह भारतीय जनता पक्ष व कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.