प्रतिनिधी / कुरुंदवाड
गेल्या दोन दिवसात कुरुंदवाड शहरामध्ये तब्बल ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका व पोलिस प्रशासनाने कुरुंदवाड शहरात गुरुवार ९ जुलैअखेर संपूर्ण टाळे बंदीची घोषणा केली आहे. गुरुवार रात्रीपर्यंत हा बंदी आदेश लागू असून रुग्ण संख्या वाढल्यास या बंदी आदेशाचा कालावधी वाढूही शकतो तसेच गुरुवारचा आठवडी बाजारही रद्द करण्यात आला आहे.
केवळ औषध दुकाने, दवाखाना व सकाळी सायंकाळी दूध विक्री वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यामुळे नेहमी गजबजलेल्या कुरुंदवाड बाजारपेठेत व शहरातील प्रमुख मार्गावर शुकशुकाट आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसर नगरपालिका प्रशासनाच्यावतीने सिल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना अलगीकरण केंद्रात हलविण्यात आले आहे.
हैदराबादवरून आलेल्या कुटुंबातील गाडी चालकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याचबरोबर कुरुंदवाड जवळील मजरेवाडी गावातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे दोन नातेवाईक कोरोनाबाधित झाले आहेत तर केरळ मधील एक पती-पत्नी कोरोनाबाधित झाले आहेत.
कुरुंदवाड शहरात नगरपालिकेच्यावतीने औषध फवारणी करण्यात आले असून कोरोनाबाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेली आहे. ११ रुग्ण आढळल्याने येथील जिल्हा परिषद दवाखाना तसेच नगरपालिका आरोग्य विभाग यांची यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे.