फोंडा भाजप मंडळाचा दावा
प्रतिनिधी/ फोंडा
जिल्हा पंचायत निवडणुकीत कुर्टी मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार संजना सुदेश नाईक या किमान दीड हजार मताधिक्क्यानी विजयी होतील, असा दावा फोंडा भाजपा मंडळाने केला आहे. कोरोनापूर्व काळात त्यांनी घेतलेल्या मतदारांच्या गाठीभेटी तसेच कोरोनाच्या काळात जनतेसाठी केलेले कार्य लक्षात घेतल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, भाजपाचे पदाधिकारी संदीप खांडेपारकर, उमेदवार संजना नाईक, पुरुषोत्तम नाईक व संतोषी शिवपूरी हे उपस्थित होते. कोरोनाकाळात बिहारमध्ये झालेली निवडणूक तसेच विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुका व तामिळनाडूतील पालिका निवडणुकीमध्ये भाजपाने सलग विजय मिळविला आहे. गोव्यातही त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास कालवेकर यांनी व्यक्त केला. मतदारांनी कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून व स्वत:ची काळजी घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना व पायाभूत सुविधा लक्षात घेतल्यास जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदार भाजपालाच कौल देतील, असे संदीप खांडेपारकर म्हणाले. गोव्यातील जनतेला मोफत पाणी व वीज पुरवठा तसेच बेरोजगार तरुणांना बेकारी भत्ता म्हणून रु. 5000 देण्याची मगो पक्षाची घोषणा हा मोठा विनोद असल्याची टीकाही संदीप खांडेपारकर यांनी केली. संजना नाईक यांना कुर्टी मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन विश्वनाथ दळवी यांनी केले. कुर्टी मतदारसंघाच्या विकासासाठी आपण बांधिल असून मतदारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन संजना नाईक यांनी केले.