मात्र पाणीपुवरठा अजून सुरळीत झालेला नाही
प्रतिनिधी / फोंडा
कुर्टी-फोंडा येथे फुटलेली 750 मि.मि. व्यासाची जलवाहिनी दुरूस्त करण्यात पाणी विभागाने काल रविवार दुपारपर्यंत यश मिळवले. फुटलेल्या जलवाहिनी जोडून कॉक्रिटच्या आवरणाने दुरूस्ती करण्यात आली आहे. मात्र सायंकाळपर्यंत फोंडय़ातील काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे फोंडावासियांचे दिवसभर पाण्यामुळे हाल झाले.
सहकारी स्पाईस फार्मजवळ गॅस जोडणीचे खोदकाम करीत असताना ओपा येथून फोंडा भागात पाणी पुरवठा करणारी 750 मिमि व्यासाची जलवाहिनी फुटण्याची घटना शनिवारी रात्री 7.30 वा. घडली होती. त्यामुळे ओपा, बोरी, उसगांव, ढवळी, बांदोडा व आसपासच्या परिसरात पाणी पुरवठा खंडीत झाला. यावेळी रस्त्याशेजारी असलेल्या चार घरात पाणी घुसून जबर नुकसानी झालेली आहे. पाण्य़ाच्या प्रवाहात माती खचून वीजेचा खांबही वाकल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाणी घुसलेल्या घरात अचानक उदभवलेल्या बिकट परिस्थितीमुळे तारांबळ उडाली होती. या घटनेत चारही घराचे नुकसनी झाली. काल दुपारी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी घटनास्थळी पाहणी केली असून बेजाबदारपणे सुरू असलेल्या कामाविषयी संताप व्यक्त केला आहे. फोंडय़ात रस्त्याचे खोदकाम करताना पाणी विभाग, वीज व सार्वजनिक बांधकाम या संबंधित खात्यानी सर्वेक्षण करून एकत्रितरित्या एकमताने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना म्हटले. अचानक उद्भवलेल्या परिस्थतीत घराची झालेली नुकसानी गॅसवाहिनी ठेकेदाराकडून वसूली करावी अशी मागणी केली आहे. संपुर्ण फोंडा शहरात मागील पाच वर्षापासून रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. मलनिस्सारण व नॅचरल गॅसवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. संबंधित खात्यांनी खोदाकामाचे काम हाती घेण्यापुर्वी जलवाहिनी, वीजवाहिनीचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत माजी नगरसेवक सुनिल देसाई यांनी मांडली आहे.