प्रतिनिधी/ फोंडा
कुर्टी-फोंडा येथे जलवाहिनी फुटून रस्त्याशेजारील असलेल्या चार घरात पाणी घुसले. सदर घटना काल शनिवारी रात्री 7.30 वा. सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत पाणी विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचले नव्हते. त्यामुळे फोंडा व आसपासच्या भागात आज रविवार दुपारपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहण्याची चिन्हे दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार कुर्टी येथील सहकारी स्पाईस फार्मजवळ गॅस जोडणीसाठी खोदकाम करीत असताना ओपा येथून फोंडा भागात पाणीपुरवठा करणारी 750 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे ओपा, बोरी, उसगांव, ढवळी, बांदोडा व आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा खंडित झाला. हजारो लिटर वाया गेले असून रस्त्याशेजारील चार घरात पाणी घुसले तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील माती खचल्याने वीज खांब वाकलेले आहेत. रात्री उशिरापर्यंत पाणी विभागाचे काम सुरू झाले नव्हते तसेच अभियंतेही संपर्काबाहेर होते.
बेजबाबदार अधिकाऱयांमुळेच नागरिकांना त्रास
रस्त्यावर खोदकाम करीत असताना पाणी विभागाचे अभियंते हजर राहणे अनिवार्य असते. मात्र जलवाहिनींची माहिती देण्यासाठी पाणी विभागाचे कर्मचारी प्रत्येकवेळी गैरहजर असल्याचे चित्र फोंडय़ात सर्वत्र खोदकाम करताना दिसत असते. काही नवीन रूजू झालेल्या अभियंत्यांना जलवाहिन्या नेमक्या कुठून-कुठे जलपुरवठा करतात तीच माहिती नसल्याचा प्रकारही गावणे येथे घडला होता. त्या अभियंत्याला ग्रामस्थांनी रोखून धरले होते, मात्र उच्च अधिकाऱयाने पाणीपुरवठा सुरळीत केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली होती. आजची घटनेमुळे खोदकाम करीत असताना पाणी विभागाचा कर्मचारी नसल्यामुळेच घडल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. बेजबाबदार अधिकाऱयामुळेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.