कुर्डुवाडी / प्रतिनिधी
दुकान बंद करून घराकडे जाणाऱ्या सराफ व्यापाऱ्याला त्याच्या घरासमोर तिघा अज्ञात चोरट्याने पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतू सराफव्यापाराने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना गुरुवार दि.३ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजण्याच्या सुमारास जैनमंदिरा जवळ कुर्डुवाडी येथे घडली .२३ जुन नंतर भर वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी घडणारी ही दुसरी घटना आहे.तसेच १९ नोव्हेंबर रोजी असेच एका सराफ व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता.यामुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, शुभंकर सुरेंद्र पाठक वय २६ रा .जैन मंदिर समोर कुर्डुवाडी हे सराफ व्यापारी सायंकाळी ०७:३० वाजण्याच्या सुमारास कामगार तानाजी सलगर यांच्या बरोबर दुचाकी गाडी क्र. एम एच ४५ यु ७४८९ या वरून त्यांचे सोन्या चांदीचे दुकान बंद करून जैनमंदिर जवळील आपल्या घराजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल वरील तिघा जणांपैकी एकाने सराफा व्यापाऱ्याच्या मागे बसलेल्या तानाजी सलगर (कामगार) यांच्या डोळ्यामध्ये तिखट टाकले व शुभंकर यांच्या वर पिस्तुल रोखून सलगर यांच्या जवळील सोने चांदीचे दागिने असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र सलगर यांनी पिशवी घट्ट धरून ठेवल्याने चोरट्यानी लुटण्याचा केलेला प्रयत्न फसला.यानंतर चोरटे विठ्ठल मंदिराच्या दिशेने पळून गेले.