तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथे बंदोबस्तासाठी आलेले मुंबईचे सहा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कोरोना पॉझिटीव्ह आढळले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की रेल्वे सुरक्षा बलाचे १० जवान बंदोबस्तासाठी मुंबईहून सोलापुर येथे आले होते.तेथून त्यांना कुर्डुवाडी येथे पाठविण्यात आले. कुर्डुवाडी येथे रात्री बरॅकमध्ये झोपले व दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.४ रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कुर्डुवाडी रेल्वे दवाखान्यात तपासणीसाठी पाठविले असता. त्यांना ताप व खोकला असल्या कारणाने शिवाय ते मुंबई येथून आल्याकारणाने पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले होते. आज त्या १० जवानांपैकी ६ जवानांचे निदान कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे रेल्वे सूत्राकडून कळाले. याबाबत तालुक्यातील व रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली असून जवानांबाबत अधिक चौकशी सुरु आहे.