९ लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे चौकशीत सिद्ध
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सचिन अनंतकवळस यांनी ९ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक संजीव पाटील यांनी कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये सचिन अनंतकवळस यांच्यासह सागर वसेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील अर्जदार मुख्याध्यापक आहेत. त्यांचेवर सोलापुर येथील लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली होती. कुर्डुवाडी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सचिन अरुण अनंतकवळस हे त्या अर्जदाराचे सक्षम अधिकारी होते. त्या अर्जदाराला लाचलुचपत विभागाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ९ लाख रुपये मागितले होते. यातील ७ लाख रुपये स्वतः अनंतकवळस यांनी तर २ लाख रुपये सागर सिद्धेश्वर वसेकर यांच्यामार्फत स्वीकारले होते. असे एकूण ९ लाख रुपये स्वीकारले बाबत चौकशीवरुन सिद्ध झाल्याने दोन्ही आरोपींवर संजीव पाटील यांनी कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे पुणे येथील अप्पर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी चौकशी केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत सोलापुर विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे व पोलीस हवालदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.