प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात काल मंगळवार रात्रीपासून सुर असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील टेंभुर्णी रोड,माढा रोड,करमाळा रोड पंढरपूर रोड येथील ऒढे नाले तुडुंब दुथडी भरून वाहू लागले. कुर्डुवाडी – सोलापुर जिल्हामार्गावर ग्रामीण रुग्णालयासमोरील रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी दुथडी भरून वहात असताना भुयारी गटारीसाठी खणलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने चारचाकी पिकअप चरीत फसून एका अंगावर कलंडला वाहन धारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्यात काही काळ वाहतूक खोळंबली.
यावेळी एक रुग्णवाहीका या रस्त्यावर येऊन थांबली असता येथील तरुण जितेंद्र गायकवाड, गणेश चौधरी, मुन्ना म्हमाने, सुजित बागल, यांच्यासह अनेक तरूणांनी पाण्यात उतरून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. रुग्णवाहीका चालकानेही मोठ्या शिताफीने गाडीचा मार्ग काढून इतर वाहनांनाही दिशा देण्याचे काम केले. यासह टेंभुर्णीरोड गोल काडादी चाळ, भैय्याचे रान, नेहरू नगर, करमाळा रोड बालाजी नगर, माढा रोड गीताबाईचा मळा, दशरथ नगर येथील रहिवास्यांच्या घरात व दुकानात पावसाचे पाणी शिरले हे पाणी थोपविण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी नागरिक शर्थीचे प्रयत्न करत असताना दिसत होते.