सुरक्षा दलांची संयुक्त कामगिरी, महिन्यात 4 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील कुलगामच्या वानपोरामध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या कारवाईमध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा दलांच्या जवानांनी मोठय़ा प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त केला आहे. काश्मीर पोलिसांचे विशेष पथक, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे. तर गेल्या महिन्याभरात तीन मोठय़ा एन्काऊंटरमध्ये चार महत्त्वाच्या आणि मोस्ट वाँन्टेड दहशतवाद्यांना संपवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांमधील उत्कृष्ट समन्वयाने हे शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
कुलगामध्ये दहशतवाद्यांविरोधातील ही गेल्या पाच दिवसांतील दुसरी कारवाई आहे. कुलगाम जिल्हय़ातील वानपोरामध्ये काही दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा या परिसराची पूर्ण नाकाबंदी करण्यात आली. सर्च ऑपरेशनवेळी उडालेल्या चकमकीमध्ये जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरुन मोठय़ा प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रs जप्त केल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, पहिल्या कारवाईमध्ये मंजगाव भागात एन्काऊंटरवेळी दोन कट्टर दहशतवाद्यांचा खेळ सुरक्षा दलाच्या जवानांनी संपुष्टात आणला होता. त्यांच्या कारवाया हाणून पाडत ठार मारले होते. तर गुरुवारी सुरक्षा दलाने सर्वात मोठे यश मिळवत पुलवामा 2 सारखे भयानक दहशतवादी कटकारस्थान हाणून पाडले आहे. पुलवामा मधील राजपोरा रोडवर शादीपुरा येथे जवानांनी सुमारे 50 किलो आयईडी भरलेली सँट्रो कार जप्त केली. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ल्याची योजना आखली होती. त्यांनी यावेळी सीआरपीएफलाच लक्ष्य केले होते. तथापि गुप्तचर यंत्रणा, पोलीसांचे विशेष पथक, सेनादले आणि सीआरपीएफच्या चौकस पथकाने हे कारस्थान उधळून लावल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
महिन्यातील सुरक्षा दलांची मोठी कामगिरी
6 मे पुलवामा : हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉपचा कमांडर रियाज नायकूचा गेम संपवला. दोन वर्षांपासून तो मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता.
16 मे डोडा : डोडा भागातील खोत्रा गावात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ताहिरचा खात्मा.
19 मे श्रीनगर : डाऊन टाऊन परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई हा फुटीरतावादी संघटना तहरीक एक हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.