ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील नागनाज चिम्मेर परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईत 3 भारतीय जवान जखमी झाले आहेत.
नागनाज चिम्मेर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, दहशतवाद्यांनी लष्करी जवान आणि पोलिसांवर गोळीबार केला. भारतीय लष्कर आणि पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भागात जवान आणि पोलिसांनी वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा जवानांनी खात्मा केला.