ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना वकील नेमण्यास भारताला संधी द्या, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत.
कुलभूषण यांना भारतीय वकील देण्याची भारताची मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली होती. पाकिस्तानच्या न्यायालयात कुलभूषण यांची बाजू मांडण्यास भारतीय वकिलाला परवानगी देणे कायद्यात बसत नसल्याचे पाकने म्हटले होते. मात्र, या शिक्षेचा पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे फेरविचार करण्यात यावा, असे निर्देश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणातील सर्व कागदपत्रे मागवून पाक सरकारचे कान टोचले. कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाला संधी द्यावी, असे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हेरगिरी आणि दहशतवादाच्याआरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.