ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या संसदेने आंतरराष्ट्रीय न्यायालय (समीक्षा आणि पुनर्विचार) विधेयक, 2020 ला मान्यता दिली आहे. यामुळे हा कायदा लागू झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांना आयसीजेसारख्या उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पाकिस्तानचे कायदा आणि न्यायमंत्री फरोघ नसीम यांच्या वतीने हे विधेयक सादर करण्यात आले होते.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. त्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालय विधेयक 2020 ला मंजुरी दिली. हा कायदा लागू होताच कुलभूषण यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार मिळणार आहे.