वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात कैद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला लढविण्यास तेथील वकिलांनी स्पष्ट नकार दिला आहे. या वकिलांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जाधव यांच्या वतीने खटला लढविण्यासाठी निवडण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने यापूर्वीच कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलांना अनुमती देण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने कथित सुनावणीनंतर कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या खोटय़ा प्रकरणी मृत्युदंड ठोठावला आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील वरिष्ठ वकील आबिद हसन मिंटो आणि मखदूम अली खान यांच्याकडून या खटल्यासाठी सहाय्य मागितले होते. दोघांनीही खेद व्यक्त करत कुलभूषण यांच्या वतीने न्यायालयात उभे राहण्यास नकार दिला आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाला स्वतःचा निर्णय कळविला आहे. आपण सेवानिवृत्त झाल्याने आता वकीली करणार नसल्याचे मिंटो यांनी म्हटले आहे. तर मखदूम यांनी स्वतःच्या कथित व्यग्रतेचे कारण दिले आहे.