बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती
प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे ग्रामपंचायतीच्या नवीन पंचायत घर प्रकल्पासाठी रु. 3 कोटी मंजूर झाले असून सभागृह व व्यायामशाळेचा त्यात समावेश असेल. याशिवाय पंचायत मैदानाच्या सुशोभिकरणासाठी रु. 1 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली.
पिंपळमळ-कुळे येथे रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण व गटारकामाला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. अंदाजे रु. 78 लाख खर्चून हे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी कुळे येथील ग्रामीण आरोग्य केंद्राच्या तळमजल्याचे उद्घाटन होणार आहे. या ग्रामीण आरोग्य केंद्राला प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देण्याची प्रक्रीया सुरु आहे असे त्यांनी सांगितले. प्रभाग 7 मधील काही अंतर्गत रस्त्यांची कामे ना हरकत दाखल्यासाठी अडकून पडली आहेत. त्यासाठी जमीन मालकांशी चर्चा केली जाईल असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच गंगाराम लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, पंचसदस्य मावरीस डिकॉस्ता, निलेश सातपालकर, नंदिश देसाई, निशा शिगावकर, आरुषी सावंत, लक्सो डोईफोडे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री दीपक पाऊसकर यांच्या सहकार्यामुळे प्रभाग 7 मध्ये रस्ते, गणेश विसर्जन शेड, शाळा व अन्य बरीच विकासकामे मार्गी लागली आहेत. पंचायत निधीतून आपण रु. 35 लाखांची कामे केल्याचे स्थानिक पंच मावरीस डिकॉस्ता यांनी सांगितले. गंगाराम लांबोर यांनी सूत्रसंचालन तर नंदिश देसाई यांनी आभार मानले.