139 घरांना पुराची झळ : बागायतीची बेसुमार हानी
प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे शिगांव पंचायत क्षेत्राला पुराचा मोठा फटका बसला असून लाखो रुपयांची नुकसानी झाली आहे. स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी सोमवारी पूरग्रस्त भागाची सरकारी अधिकाऱयांसह पाहणी केली. या महापुरात पुरात गणपती विसर्जन करण्याच्या सात शेडी व एक घर जमीनदोस्त झाले असून शेती बागायतीचीही बेसुमार हानी झाली आहे.
माटोजे, वानसाय, तुरीमरड, बिंबल व कुळे भागातील नुकसानग्रस्त भागाची पाऊसकर यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच मनीष लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, पंचसदस्य मच्छिंद्र देसाई, लक्सो डोईफोडे, निशा शिगांवकर, आरुषी सावंत, उपजिल्हाधिकारी केदार नाईक, कृषी अधिकारी नागेश कोमरपंत, जलस्रोत विभागाचे अभियंते श्री. रायकर, बांधकाम खात्याच्या इमारत विभागाचे अभियंते सुधीर परब आदी उपस्थित होते.
वासीमरड येथील कुमार मोहिते यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. वानसायवाडा शिगांव येथील प्रकाश पंढरी देसाई, मारुती देसाई, विष्णू देसाई, राघोबा देसाई, अनिकेत देसाई, सुशांत देसाई, नवनाथ मामलेकर, शशिकांत वेळीप, दामोदर परब, जयदीप शिरोडकर, गिरीराज पाटील, नरेश शिगांवकर, मॅथ्यू, आनंद म्हार्दोळकर, सत्यवान वेळीप, शांताराम वेळीप, अखिल वेळीप, जयराम देसाई, विजयकुमार मोहिते, उर्मिला रिवणकर, रामा गांवकर, आनंद गांवकर, रंगनाथ गांवकर, देविदास सावंत या बागायतदारांसह दूधसागर कृषी उद्योग यांचे बागायती व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात प्रकाश देसाई यांच्या बागायतीची सर्वाधिक हानी झाली आहे.
पंचायत क्षेत्रातील सुमारे 139 घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यात बऱयाच घरांची मोठी नुकसानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले, मोडून पडलेल्या गणपती विसर्जन शेड्स गणेश चतुर्थी पूर्वी बांधकाम खात्यातर्फे बांधून दिल्या जातील. शिवाय पूरग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. कुळे शिगांव पंचायतीकडून व आपण स्वतः वैयक्तिकरित्या जी मदत शक्य आहे देऊ. दरम्यान धारबांदोडा तालुक्यात शेती बागायतीचे अंदाजे रु. 25 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांनी व्यक्त केला. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.