वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या 74 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पहिल्या दिवशी तीन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले. जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरूषांच्या 100 मी बॅकस्टोकमध्ये तर दिल्लीच्या रावतने पुरूषांच्या 400 मी. फ्री स्टाईलमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम केले.
पुरूषांच्या 100 मी. बॅकस्टोकमध्ये श्रीहरी नटराजने 55.10 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना यापूर्वी स्वतःचाच नोंदविलेला 55.63 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नटराज थेट पात्र ठरला होता. या क्रीडा प्रकारात कर्नाटकाच्या शिवाने 57.60 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तर गोव्याच्या झेवियर डिसोझाने तिसऱया स्थानासह कास्यपदक मिळविताना 58.96 सेकंदाचा अवधी नोंदविला.
पुरूषांच्या 400 फ्रीस्टाईल प्रकारात दिल्लीच्या रावतने 3 मिनिटे, 53.68 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकांसह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना 2018 साली त्रिवेंद्रममध्ये झालेल्या स्पर्धेत नोंदविलेला साजन प्रकाशचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. कर्नाटकाच्या अनिष गौडाने रौप्य तर कर्नाटकाच्या शोहन गांगुलीने कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या 100 मी. बॅकस्टोकमध्ये कर्नाटकाच्या 14 वर्षीय रिदिमा वीरेंद्रकुमारने 1 मिनिट, 04.40 सेकंदासह सुवर्णपदक, गुजराथच्या माना पटेलने रौप्यपदक तर कर्नाटकाच्या निना व्यंकटेशने कास्यपदक घेतले. पुरूषांच्या 50 मी. बटरफ्लाय प्रकारात प्रकाशने 24.90 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण पटकाविले. पुरूषांच्या 4ƒ200 मी.फ्रीस्टाईल प्रकारात कर्नाटकाने नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक घेतले.