प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील कुसमळी तसेच लक्केबैल गावचे ग्राम पंचायत सदस्य पंच कमिटी व गावातील प्रमुखांनी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांची बेळगाव येथे भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
त्यामध्ये कुसमळी गावात लक्ष्मी मंदिर विकासाचे काम सुरू आहे. या कामासाठी तसेच गावातील रस्ते विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करून द्यावा, अशी त्यामध्ये मागणी करण्यात आली आहे. तर लक्केबैल गावात सिमेंट काँक्रीट रस्ते करण्यासाठी अनुदान मंजूर करून द्यावेत, अशी त्यांनी सादर केलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
यावेळी पंडित ओगले यांनी दोन्ही गावातील अडचणी त्यांच्या कानी घातल्या. यावर विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी कुसमळी गावातील मंदिर विकासासाठी तसेच गावातील रस्त्याच्या विकासासाठी आमदार फंड तसेच इतर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच लक्केबैल गावातील काँक्रीट रस्त्यांसाठी राज्य शासन तसेच ग्रा. पं.कडून अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी पंडित ओगले यांच्यासमवेत ग्रा. पं. सदस्य परशराम गुरव, अर्जुन सनदी, तुकाराम चव्हाण, चंद्रगौडा पाटील, पवन गायकवाड, अनंत सावंत, चंद्रकांत पाटील, पुंडलिक पाटील, पिराजी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.