कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपद, करुणारत्ने, मॅथ्यूज, थिरिमने, चंडिमल यांना डच्चू
वृत्तसंस्था/ कोलंबो
बांगलादेशविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाज कुसल परेराला लंकेच्या वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले असून कुसल मेंडिसकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
परेराने 101 वनडे, 22 कसोटी व 47 टी-20 सामन्यांत लंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. दिमुथ करुणारत्नेच्या जागी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. करुणारत्ने, वरिष्ठ अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, आघाडीचा फलंदाज लाहिरु थिरिमने, यष्टिरक्षक दिनेश चंडिमल यांना या संघातून वगळण्यात आले आहे. लंकन निवड समितीने बुधवारी या संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज चमिका करुणारत्ने व फलंदाज शिरन फर्नांडो यांना मर्यादित षटकाच्या संघात प्रथमच संधी मिळाली आहे तर फलंदाज बिनुरा फर्नांडो याचीही या संघात निवड करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत फक्त दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 16 मे रोजी लंका संघ बांगलादेशकडे प्रयाण करणार असून या मालिकेत तीन वनडे सामने ढाका येथे 23, 25 व 28 मे रोजी होणार आहेत.
बांगलादेश दौऱयासाठी निवडण्यात आलेला लंका संघ ः कुसल परेरा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार) दनुष्का गुणतिलका, धनंजय डिसिल्वा, पथुम निसांका, दसुन शनाका, ऍशन बंदारा, वनिंदू हसरंगा, इसुरु उदाना, अकिला धनंजय, निरोशन डिक्वेला, दुश्मंता चमीरा, रमेश मेंडिस, असिता फर्नांडो, लक्षण संदकन, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो.