वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज कुसल परेरा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह ठरला आहे. पुढील महिन्यात लंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंकेत होणाऱया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी लंकन संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली.
कुसल परेरा 31 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या मे महिन्यात परेराची लंकन संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली लंकन संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आले. मध्यंतरी खांद्याच्या दुखापतीमुळे तो भारताविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. कुसल परेरा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह ठरल्याने त्याला आता दोन आठवडय़ासाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. लंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला 2 सप्टेंबरपासून कोलंबोत प्रारंभ होईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ लंकेच्या दौऱयात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.