प्रतिनिधी/ कराड, कोयना वसाहत
कराड तालुक्यात बिबटय़ांचा वावर नित्याचा झाला आहे. पोतले येथे एका बिबटय़ाला पिंजऱयात पकडले असताना कुसूर आणि तारूखच्या हद्दीवरील पांढरीची वाडी येथे ऊस तोड सुरू असताना बिबटय़ाचे तीन बछडे आढळले. वनविभागाने हे तीन बछडे ताब्यात घेतले होते. त्या परिसरात मादी बिबटचे दर्शन झाल्याने सायंकाळी हे बछडे शेतात ठेवून मादी व बछडय़ांचे मिलन करण्याचे ऑपरेशन वनविभागाने हाती घेतले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार 31 रोजी तारुख व कुसूरच्या हद्दीवर पांढरीची वाडी (ता. कराड) येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी सुरू असताना शिवारात बिबटय़ाची तीन पिल्ले आढळली. शेतकऱयांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना कल्पना दिली. त्यांनी वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कल्पना दिली.
वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबटय़ाची पिल्ले ताब्यात घेतली. त्यावेळी मादी बिबटय़ा ही जवळपासच होती. ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन पिलांचे आईसोबत मिलन घडवून आणायचे ठरले. त्याप्रमाणे सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन पिल्ले एका क्रेटमध्ये घालून आजूबाजूला कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरा लावत असताना बिबटय़ाच्या मादीने शेजारी दर्शन दिले. ती आजूबाजूला घुटमळत होती. त्यामुळे पिल्ले क्रेटमध्ये ठेवून कॅमेरा लावून अधिकारी जागेवरून निघून आले. सापडलेले तीन पिल्लं 1 नर जातीचे असून 2 माद्या आहेत. त्यांचे वजन सव्वा दोन ते अडीच किलो इतके आहे. साधारणतः 50 ते 55 दिवसांचे वय आहे.
वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबूराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.