ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सागर राणा हत्या प्रकरणातील फरार ऑलिंपिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला त्याच्या एका साथीदारासह दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज सकाळी अटक केली. आयुक्त नीरज कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सागर राणा या 23 वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटूला छत्रसाल स्टेडियमवर 4 मे च्या रात्री सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. या मारहाणीत सागर राणाचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमार आणि त्याचे 9 साथीदार फरार होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 5 मे पासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. दरम्यानच्या काळात सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र हत्या आणि अपहरणासारखा गुन्हा दाखल असल्याने न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता.
त्यामुळे सुशील कुमारला पकडण्यासाठी पोलिसांनी पंजाबमधील भटिंडा, मोहाली, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. मात्र, सुशील कुमार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर आज सकाळी त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली.