विश्वचषक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारेचा निसटता पराभव
वार्ताहर/ औंध
सर्बिया येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेत जागतिक पदक विजेता अर्जूनवीर राहुल आवारेचा निसटता पराभव झाला. मात्र हातातून निसटलेल्या विजयाची कुस्ती शौकिनांना हुरहूर लागली आहे.
बेलग्रेड सर्बिया येथे झालेल्या वैयक्तिक विश्वचषक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. 61 किलोवजनगटात फ्रीस्टाईल प्रकारात
पात्रता फेरीत राहुल ने हंगेरी च्या रिचर्ड्स विल्यम ला 10-0 असे एकतर्फी हरवल्याने कुस्तीशौकिनांना पदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
उपांत्यपूर्व फेरीतच्या लढतीत अर्जेंटिना च्या ऑगस्टीन आलेजांड्रोशी चुरशीचा सामना झाला.
6 विरुद्ध 4 गुणांनी राहुल आघाडीवर असताना शेवटच्या काही सेकंदात आँगस्टीन ने निर्णायक दोन गुण घेऊन लढतीत बरोबरी साधली. मात्र शेवटचा गुण आँगस्टीनने घेतल्याने त्याला विजयी घोषित करण्यात आले.अत्यंत चुरशीच्या लढतीत राहुलला निसटता पराभव पत्करावा लागला.
.सेमी फायनल मध्ये ऑगस्टीन आलेजांड्रो रशियन मल्लाकडून पराभूत झाल्याने राहुलच्या कांस्यपदक लढतीच्या आशाही मावळल्या. गेली वर्षभर राहुल नाशिकच्या पोलीस अकादमीत विभागीय पोलीस अधिक्षक पदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नुकताच पुणे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक पदभार घेतला आहे.
प्रशिक्षण काळात सराव बंद असल्याचा फटका राहुलला या लढतीत बसला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव पणाला लावून राहुलने झुंजार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. हातातोंडाशी आलेला विजय हातून निसटल्यामुळे कुस्ती शौकिनांनी हुरहूर लागली.