वृत्तसंस्था/ सिडनी
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळे यांच्या आयसीसी क्रिकेट समितीने चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने, यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याची परवानगी देणारा नियम केला जावा, अशी मागणी केली आहे.
सर्वच वेगवान गोलंदाज दीर्घ काळापासून चेंडू स्विंग होण्यासाठी लाळेचा वापर करत आले आहेत. पण कोव्हिड 19 च्या उद्रेकानंतर आता त्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. ‘लाळेचा वापर करण्यावर बंदी घालणार असाल तर त्यावर पर्याय उपलब्ध करून द्यावा,’ असे कमिन्सने म्हटले आहे. ‘घामाचा वापर करणे वाईट नाही. पण त्यापेक्षाही वेगळे काहीतरी असण्याची गरज आहे. मेण किंवा तत्सम पदार्थाचा वापर करू देण्याचा विचार व्हायला हवा. लाळ वापरणे धोकादायक असल्याचे विज्ञान सांगते. असे असेल तर पर्यायही उपलब्ध करून द्यावा,’ असे मतही त्याने मांडले आहे. विशेष म्हणजे चेंडूची चमक वाढवून स्विंग होण्यास मदत करणारे वॅक्स ऍप्लिकेटर तयार करण्यात आले असल्याचे ऑस्ट्रेलियातील चेंडू निर्माती कंपनी कोकाबुराने अलीकडेच सांगितले आहे.