मजगावात मोठय़ा प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषीविषयक मार्गदर्शन शिबिर :
प्रतिनिधी / बेळगाव
भात पिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी कृषी खाते बेळगावतर्फे शेतकऱयांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मजगाव येथील श्री ब्रम्हदेव मंगल कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी बी. डी. कुडची होते.
यावेळी शेतीतज्ञ डॉ. पौर्णिमा मट्टी, ए. आर. एस. संकेश्वर, आर. बी. नायकर, साहाय्यक कृषी निर्देशक एम. सी. मठ्ठद, उपयोजना निर्देशक आर. एन. भट्ट, तांत्रिक व्यवस्थापक शिवाजी पट्टण, सावंत पुजारी, नेमू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मजगाव परिसरातील शेतीमध्ये बासमती, इंद्रायणी व इतर जातीची मुख्य पिके आहेत. यावर गेल्या पंधरा दिवसापासून मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व पिके नष्ट होत असल्याचे कृषी संघटनेने कृषी खात्याच्या अधिकाऱयांच्या निदर्शनाला आणून दिले.
औषध फवारणीबाबत मार्गदर्शन
त्यानंतर अधिकाऱयांनी कृषी शिबिर घेऊन रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पौर्णिमा मट्टी म्हणाल्या सेंद्रिय शेती करा, रासायनिक खतांचा वापर कमी करा, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा, शेणखत गांडूळखत वापरा, ऍझोला प्रक्रिया, झिंक पावडरचा वापर तसेच भाताचे पिंजर बारीक करून शेतामध्ये पसरवा. त्यामुळे जमिनीची पत वाढण्यास वाढून भरघोस पिके येण्यास मदत होते. सध्या पडलेल्या मावा रोगावर ऑल फॉल, सिमका ही औषधे प्रभावी आहेत. ती कशी वापरणे याबद्दल शेतकऱयांना सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱयांनी दिली.
यावेळी साहाय्यक कृषी निर्देशक आर. एन. नायकर व एम. सी. मठ्ठद, आर. एन. भट्ट यांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातर्फे शिवाजी पट्टण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातील बी. डी. कुडची व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले.
यावेळी सर्व शेतकऱयांना मास्क व वही पेन दिले. गावातील शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. मलसर्ज सनदी यांनी आभार मानले.