महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांचे आवाहन, 31 मार्च 2022 पर्यत कृषीधोरणाची मुदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यशासनाने शेतकऱ्यांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी कृषी धोरण 2020 हे महत्वकांक्षी धोरण जाहिर केले आहे. सद्यस्थितीत महावितरणकडून कृषी धोरणाची अंमलबजावणी करण्यात येते आहे. या धोरणांतर्गत कृषीपंप ग्राहकांनी 31 मार्च 2022 पर्यंतच्या मुदतीत 50 टक्के थकीत वीज बिल भरल्यास 50 टक्के वीज बिल माफ होणार आहे. तरी कृषी धोरणाचा लाभ घेऊन कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे.
कृषी धोरणानुसार चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित सर्व उच्चदाब, लघुदाब कृषीपंप ग्राहक आणि उपसा जलसिंचन योजना सुधारीत मुळ थकबाकीची 50 टक्के रक्कम भरून उर्वरीत 50 टक्केच्या माफी योजनेचा लाभ घेऊ शकतात. एक ते तीन वर्षासाठी टप्प्याने योजनेत सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रक्कमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱया 30 टक्के तर तिसऱ्या वर्षात 20 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. कृषीपंप ग्राहकांनी चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.
कृषी धोरणानुसार निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर सप्टेंबर 2020 अखेर कोल्हापूर,सांगली जिह्यात 3 लक्ष 84 हजार 519 कृषिपंप ग्राहकांकडे 1 हजार 482 कोटीं 62 लक्ष रूपयांची सुधारीत थकबाकी आहे.कोल्हापूर जिह्यात 1 लक्ष 45 हजार 453 ग्राहकांकडे 429 कोटी 42 लक्ष रूपये तर सांगलीत 2 लक्ष 39 हजार 66 ग्राहकांकडे 1053 कोटी 20 लक्ष रूपये थकबाकी आहे. निर्लेखनाव्दारे दोन्ही जिह्यात मिळून 107 कोटी 98 लक्ष रुपये तर विलंब आकार व व्याजाचे 168 कोटी 69 लक्ष रुपये माफ करण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत कोल्हापूर व सांगली जिह्यातील 1 लक्ष 42 हजार 98 कृषिपंप ग्राहकांनी 234 कोटी 23 लक्ष रुपये चालू व थकीत वीज बिल भरून कृषी धोरणाचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर जिह्यातील 81 हजार 306 कृषीपंप ग्राहकांनी 117 कोटी 67 लक्ष व सांगली जिह्यातील 60 हजार 792 कृषिपंप ग्राहकांनी 116 कोटी 56 लक्ष रुपये चालू व थकीत वीज बिल भरले आहे.
कृषी ग्राहकांकडून भरणा झालेल्या रक्कमेच्या प्रत्येकी 33 टक्के प्रमाणे ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर कृषी आकस्मिक निधीत जमा करण्यात येणार आहेत. कृषी धोरणानुसार सदर निधीतून ग्रामपंचायत व जिह्याच्या क्षेत्रात नवीन उपकेंद्र,वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण, विस्तारीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. कृषी ग्राहकांना वीज बिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने पुढील वेबपोर्टलवर https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.