प्रतिनिधी/ कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले व उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व 21 जागांवर अकरा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर आज कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडली. अध्यक्षपदी डॉ. सुरेश भोसले व उपाध्यक्षपदी जगदीश जगताप यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी, संजय सुद्रीक, जे. पी. शिंदे उपस्थित होते. त्यानंतर कारखाना सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात कराड, वाळवा, कडेगाव तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉ. भोसले म्हणाले, की या निवडणुकीत सभासदांनी इतिहास घडविला आहे. सभासदांनी मोठय़ा मताधिक्याने आम्हाला निवडून दिले असल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत आहोत. येत्या काळात कारखान्याची क्षमता वाढविण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे.
कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले म्हणाले, की गेल्या 6 वर्षात डॉ. सुरेशबाबांनी कृष्णा कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सभासदांनी याची दखल घेत यंदाच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला मोठय़ा मताधिक्याने निवडून दिले. सर्व सभासदांना बरोबर घेऊन जाण्याची आणि सर्वांना समान न्याय देण्याची आमची भूमिका असणार आहे. या निवडणुकीत आम्ही सभासदांना मोफत साखर घरपोच देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची दिवाळीपूर्वीच अंमलबजावणी करून प्रत्येक सभासदाला मोफत साखर घरपोच केली जाईल. कृष्णा बँकेच्या माध्यमातून कारखान्याचे नवीन ऑफिस बांधण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यंदाच्या निवडणुकीत एका राज्यमंत्र्याने सत्तेचा व पैशांचा अहंकार दाखविण्याचा प्रयत्न केला. पण ज्याप्रमाणे 40,000 एकरवाल्या विजय मल्ल्याची अवस्था झाली, तशीच अवस्था या 400 एकरवाल्या राज्यमंत्र्याची कृष्णेच्या सभासदांनी केली. हा मंत्री 15 दिवस या निवडणुकीच्या प्रचारात फिरत होता, त्यांच्या उमेदवारांना अवघी 4500 मते मिळाली, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सभासदांनी एका अर्थाने सत्तेचा व पैशाचा अहंकार धुडकावून लावला, अशी टीका डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नाव न घेता विश्वजीत कदम यांच्यावर केली.
जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, कराड तालुका साखर कामगार संघाच्यावतीने अध्यक्ष एम. के. कापूरकर व गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकाऱयांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, सयाजी यादव, लिंबाजी पाटील, संभाजीराव पाटील, दत्तात्रय देसाई, जितेंद्र पाटील, संजय पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, अविनाश खरात व वसंतराव शिंदे यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक, कार्यक्षेत्रातील प्रमुख नेतेमंडळी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. नूतन संचालक बाबासाहेब शिंदे यांनी आभार मानले.