प्रतिनिधी/ कराड
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 91 टक्के मतदान झाले आहे. गुरूवारी 1 जुलैला सकाळी आठपासून येथील वखार गोदामात मतमोजणी होणार आहे. प्रथमच केंद्रनिहाय मतमोजणी होणार असून दुपारी साडे बारापर्यंत पहिल्या फेरीचे कल तर सायंकाळी साडे चारपर्यंत संपूर्ण निकाल समजणार आहे. दरम्यान, निवडणुकीत सहकार, संस्थापक आणि रयत पॅनेलकडून विजयाचे दावे केले जात आहेत.
कृष्णा कारखान्याच्या आजवरच्या निवडणुका चुरशीने झाल्या आहेत. कोरोनाचे संकट असतानाही या निवडणुकीत मयत सभासद वगळल्यास 91 टक्के मतदान झाले आहे. एकुण 47 हजार 145 पैकी 34 हजार 532 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2015 सालच्या निवडणुकीत 79 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्याने कोणाला धक्का बसणार, याची चर्चा रंगली आहे. उत्स्फूर्त मतदान झाल्याने सभासदांनी नेमका कोणाला कौल दिला, याची आकडेमोड तिन्ही पॅनेलचे समर्थक करत आहेत. दरम्यान, मागचा अनुभव लक्षात घेता मतमोजणी प्रक्रियेवेळी कोणताही वाद होऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी तिन्ही
पॅनेलच्या समर्थकांची बैठक घेऊन मतमोजणी कशी होणार, याची माहिती दिली. तर पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. 74 टेबलावर मतमोजणी होणार असून त्यासाठी सुमारे 325 अधिकारी यांची नेमले आहेत. मतमोजणीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर दोन फेऱयात मतमोजणी होणार आहे. पहिली पेटी दिल्यानंतर त्यातील मतपत्रिकांची हिशोबाप्रमाणे पडताळणी करण्यात येणार आहे. गटनिहाय गठ्ठे केल्यानंतर प्रथम अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, महिला राखीव व त्यानंतर गट 1 ते 6 गटांची मतमोजणी होणार आहे. यात 1 जागा असणाऱया दोन राखीव गटांचा निकाल सर्वप्रथम समजणार आहे.
वखार गोदाम परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून कार्वे नाका ते भेदा चौक या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजयी मिरवणुका, सभा, गर्दी, गुलाल यास पोलिसांनी मनाई केली आहे.