प्रतिनिधी / सातारा :
सातारच्या मेडिकल कॉलेजची जागा ही कृष्णा खोरे विभागाची होती. त्या जागेत तब्बल चाळीस वर्षांपासून 35 कुटुंब रहात होते तर काहीजण पाट बंधारे विभागाच्या गाळ्यात अनधिकृतपणे रहात होते. त्यांना नोटीस देऊन ही ते जागा सोडत नव्हते. त्यामुळे मंगळवारी पोलीस प्रशासन व कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रं 2 यांनी संयुक्तरित्या बुलडोझर फिरवला. या कारवाईमुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील कृष्णानगर येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाची प्रशस्त अशी जागा आहे. त्या जागेपैकी 62.6 एकर क्षेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावे हस्तांतरीत झाले आहे. याच जागेत तब्बल चाळीस वर्षापासून काही मंडळी राहत आहेत तर काही मंडळी गाळे वापरत होते. हे गाळे ठराविक वर्षाकरता भाडय़ाने दिल्याचे समजते. करार संपल्यावर ही गाळे धारकांनी त्याच गाळ्यात आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. काही जणांनी तर कृष्णा खोरेच्या जागेत घरे ही बांधली होती. संबंधिताना पाटबंधारे विभागाने चार महिन्यांपूर्वी जागा खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसा देऊन ही कोणतीही हालचाल झाली नसल्याने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
अतिक्रमण हटाव मोहिम कृष्णा खोरे विकास महामंडळाचे धोम विभागाचे अभियंता विकास पाटील हे पूर्ण तयारीत आले होते. जेसीबी, बुलडोझरसह मोठा पोलीस फाटा घेऊन सकाळी 7 वाजताच अतिक्रमण काढायला आले. त्यावेळी त्यांच्या आदेशानुसार जेसीबी अतिक्रमण केलेल्या घराच्या दिशेने जात होता. घरे पडत होती. वादविवाद होत होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होत होते. डीवायएसपी आचल दलाल स्वतः ऑन दि फिल्ड होत्या. तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह 250 पोलीस कर्मचारी तैनात होते.