प्रतिनिधी/ कराड
येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून ’कोरोना वॉरियर्स’ना मानवंदना देण्यात आली.
कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कराड रुक्मिणीनगर येथील 28 वर्षीय महिला, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला आणि वनवासमाची येथील 74 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांचे हॉस्पिटलच्या प्रांगणात आगमन झाल्यावर सुरक्षा रक्षकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये रुक्मिणीनागर कराड येथील 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ही महिला दाखल झाली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यावेळी त्या महिलेला कॉटेजमधून कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. आता ती कोरोनामुक्त झाली आहे. आज तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या काळजीमुळे मी पूर्णपणे बरी झाले असून, आता समाजाने आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता, आम्हालाही आपल्यात सामावून घ्यावे, असे भावनिक आवाहन या महिलेने केले. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनीही रूक्मिणीनगरमधील कोरोनामुक्त महिलेचे स्वागत केले.