गुरुवारपासून लसीकरणास प्रारंभ, कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लशींचे डोस दाखल
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाविरूद्धच्या लढय़ात सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचे 6000 डोस, तर कोव्हॅक्सिनचे 2880 डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवार 22 जुलैपासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना सकाळी 9.30 ते 5 या वेळेत माफक दरात ही लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबरल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाविरूद्धच्या लढय़ात कृष्णा हॉस्पिटल सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्मितीबरोबरच कोरोना चाचणी व लसीकरणात कृष्णा हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून सहा हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पहिल्या टप्पातील लसीकरण मोहिमेअंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये जवळपास नऊ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
या लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कोविशिल्डच्या एका डोसची किंमत 780 रुपये असून, कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1200 रुपये आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल आणावा. ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू आहेत अशा रुग्णांनी, तसेच इमनोकोंप्रमाईज रुग्ण तसेच मधुमेही अथवा उच्चरक्त्दाब असणाऱया रूग्णांनी आपल्या डॉक्टरना तब्येत दाखवून, त्यांच्याकडून लस घेण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे.
कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.