वास्कोत भाजप बळकट होण्याची आशा व्यक्त
प्रतिनिधी /पणजी
वास्कोचे माजी नगरसेवक तथा मुरगाव पीडीएचे माजी अध्यक्ष कृष्णा (दाजी) साळकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मंगळवारी भाजपात फेरप्रवेश केला. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे वास्कोत भाजपला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दाजी साळकर यांनी नगरसेवक शमी साळकर आणि शैलेश बोरकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस दामू नाईक, प्रवक्ता ऍड. नरेंद्र सावईकर, वास्कोचे भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक आणि माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर आदींची उपस्थिती होती.
साळकर यांनी 2017 मध्ये विद्यमान आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यात केवळ 750 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. अपक्ष म्हणून निवडणूक लढविली तरीही ते भाजपशी कायम जवळीक ठेऊन होते. त्यामुळेच गत पाच वर्षात त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही व आता ते अधिकृतरित्या पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपबद्दल लोकांचे असलेले प्रेम पाहता येत्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने तिसऱयांदा सत्तेवर येईल, अशी आशा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यामुळे भाजपसोबत काम करण्याची आणि देशाला जगातील एक मजबूत राष्ट्र बनविण्याची इच्छा असलेले अनेक नेत, कार्यकर्ते येत्या दिवसात भाजपात रुजू होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साळकर यांच्या प्रवेशामुळे मुरगाव तालुक्यात भाजप अधिक बळकट होईल व 2022 मध्ये 22 ही घोषणा सत्यात येईल, असे ते म्हणाले.
पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी बोलताना भाजपमध्ये कार्यकर्त्यांना जेवढा मान मिळतो तेवढा अन्य पक्षात मिळत नाही, असे सांगितले. श्री. तानावडे यांनी बोलताना साळकर यांच्या प्रवेशामुळे वास्कोत भाजपचा विजय निश्चित असून मुरगाव आणि डिचोलीतही आम्ही मजबूत बनत असल्याचे ते म्हणाले. श्री. साळकर यांनीही विचार मांडले. आजच्या या क्षणाची आपण गत पाच वर्षांपासून वाट पहात होतो, असे ते म्हणाले.