ई-कॉमर्स पोर्टल, देशातील दुकानदारांना होणार लाभ
वृत्तसंस्था/ मुंबई
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट) यांच्याकडून एक वेंडर मोबाईल ऍप ‘भारत ई-मार्केट’ पोर्टलचे सादरीकरण करण्यात आले आहे. सदरचे ऍप हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचे समजते. कॅटच्या माहितीनुसार या ऍपच्या मदतीने देशातील जवळपास 8 कोटी व्यापाऱयांना एक समान प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. जो आपल्या जुन्या ग्राहकांसाठी डिजिटल माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ करणार आहे.
या ऍपच्या माध्यमातून देश आणि विदेशातील ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर मिळणार आहे. यासोबतच ऍपच्या माध्यमातून रिटेल व्यापारी प्रत्येक भारतीयांच्या घरापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचे कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी नमूद केले आहे.
ई-दुकानांवर शुल्क आकारणी नाही
देशातील व्यावसायिक ऍपच्या आधारे किरकोळ ई-दुकाने सुरु होणार आहेत. ‘भारत ई-मार्केट’ पोर्टलची रचना ही पूर्णपणे देशातील कायद्यांच्या नियमावलीत आधीन राहून करण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱयांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी होणार नसून ई-कॉमर्स पोर्टलच्या व्यवहारांवर 5 ते 35 टक्क्यांपर्यंत कमीशन शुल्क आकारण्यात येणार असल्याचे खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.
विक्रेते होणार ऑन बोर्ड
31 डिसेंबर 2021 पर्यत कमीत कमी सात लाख विक्रेत्यांना ऑन बोर्ड करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासोबतच 31 डिसेंबर 2023 पर्यंत एक कोटी विक्रेत्यांना जोडण्यात येणार आहे.