10 दिवसांमध्ये 6 मंदिरांमधील दागिने चोरले
@ वृत्तसंस्था / टोरंटो
कॅनडात मागील काही दिवसांपासून सातत्याने हिंदू मंदिरांना लक्ष्य करत तेथे तोडफोड आणि लूट करण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे भाविक आणि पुजाऱयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मागील 10 दिवसांमध्ये 6 मंदिरांमध्ये लूट करण्यात आली आहे. समाजकंटकांनी दानपेटीतून रक्कम चोरण्यासह मूर्तींवरील दागिनेही लंपास केले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जातोय.
15 जानेवारी रोजी हनुमान मंदिरात तोडफोडीसह या घटना सुरू झाल्या ओत. ग्रेटर टोरंटो एरियाच्या ब्रॅम्पटनमध्ये हनुमान मंदिरात तोडफोड करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. तर 25 जानेवारी रोजी याच शहरात दुर्गामातेच्या मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. या दोन्ही घटनांनंतर समाजकंटकांनी गौरीशंकर मंदिर आणि जगन्नाथ मंदिरात देखील नुकसान घडविले आहे. 30 जानेवारी रोजी मिसिसॉगामध्ये हिंदू हेरिटेज सेंटरमध्ये 2 जणांनी दानपेटी आणि मुख्य कार्यालयात तोडफोड केली.
तोडफोडीच्या घटना मध्यरात्री 2-3 वाजण्याच्या दरम्यान घडत आहेत. सीसीटीव्हींमध्ये आरोपी कैद असून त्यात ते बॅकपॅकसह विंटर गियर तसेच चेहरा झाकलेले दिसून येतात. हे चोर मंदिरात शिरल्यावर दानपेटीत रोकड आणि देवतांच्या पुजेत वापरल्या जाणाऱया दागिन्यांचा शोध घेतात.