ग्रेटर टोरंटोच्या रस्त्यांवर मोदींचे बिलबोर्ड
वृत्तसंस्था / टोरंटो
कॅनडाच्या गेटर टोरंटोच्या रस्त्यांवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होर्डिंग्स दिसून येत आहेत. भारताने कॅनडाला कोरोनावरील लसींचा पुरवठा केला आहे. याचमुळे कॅनडाने पंतप्रधान मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत. ‘कॅनडाला कोरोनाची लस उपलब्ध करविण्यासाठी भारत आणि नरेंद मोदींचे धन्यवाद’ असे या बिलबोर्डमध्ये नमूद आहे.
कोरोना संकटाला तोंड देणाऱया कॅनडाला भारताने लसींचा पुरवठा केला होता. पंतप्रधान मोदींनी अलिकडेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी चर्चा करत कोरोनाशी लढण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. कोरोना विरोधातील युद्ध जगाने जिंकल्यास यात भारताच्या जबरदस्त लसउत्पादन क्षमतेचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार असल्याचे उद्गार ट्रुडो यांनी काढले होते. भारताने जगभरातील 65 देशांना कोरोनाची लस पाठविली आहे. अनेक देशांना लस मोफत देण्यात आली असून काही देशांना याची नाममात्र दरात विक्री करण्यात आली आहे. शेजारी देश श्रीलंका, भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्सला सुमारे 56 लाख लसीचे डोस मोफत देण्यात आले आहेत. भारतात सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे उत्पादन करत आहे.