लिबरल पार्टीचा विजय – पूर्ण बहुमत न मिळाल्याने आघाडी करणे भाग
वृत्तसंस्था/ टोरंटो
जस्टिन ट्रुडो सलग तिसऱयांदा कॅनडाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या लिबरल पार्टीने निवडणुकीत विजय नोंदविला आहे. ट्रुडो 2015 पासून देशातील सत्तेवर असून 6 वर्षांमध्ये तिसऱयांदा ते निवडणूक जिंकले आहेत. पण त्यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त करता आलेले नाही.
ट्रुडो यांनी या निवडणुकीत एका कॉन्झर्व्हेटिव्ह नेत्यावर मात केली आहे. ट्रुडो यांनी मागील महिन्यात देशात मध्यावधी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. स्वतःच्या अल्पमतातील सरकारला बहुमत मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. पण या निवडणुकीचा निकाल देखील 2019 च्या निवडणुकीप्रमाणेच राहिला आहे. यावेळी देखील त्यांना अल्पमतातील सरकार स्थापन करावे लागू शकते.
कॅनडामध्ये पूर्ण बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला प्रतिनिधिगृहात 338 जागांपैकी 170 जागा जिंकणे आवश्यक आहे. या निवडणुकांमध्ये ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीने 156 जागा जिंकल्या आहेत. तर कॉन्झर्व्हेटिव्ह पाटींने 123 जागांवर विजय मिळविला आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रुडो यांच्या पक्षाने 157 जागांवर तर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने 121 जागांवर यश मिळविले होते.
देशात सरकार चालविण्यासाठी एक स्पष्ट जनमत आम्ही प्राप्त केले आहे. पण बहुमत गाठण्याच्या लक्ष्यापासून दूर राहिल्याचे उद्गार ट्रुडो यांनी विजयानंतर काढले आहेत. कोरोना महामारीवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविल्याने ट्रुडो यांच्या सरकारने मध्यावधी निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तर विरोधी पक्षांकडून ट्रुडो यांना याप्रकरणी लक्ष्य केले जात होते.
आमचे सरकार लसीकरणाचे प्रमाण, लोकांसाठी रोजगार, उद्योग वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे ट्रुडो यांचे म्हणणे आहे. रुढिवादी नेते एरिन ओ टोल यांचा पक्ष या निवडणुकीत दुसऱया स्थानावर राहिल आहे.
कॅनडातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी अन्य राजकीय पक्षांसोबत काम करणार आहे. या महामारीतून बाहेर काढण्यासाठी आणि भविष्यात उज्ज्वल दिवस पुन्हा आणण्यासाठी जनमत मिळाले आहे. लाखो कॅनेडियन लोकांनी एक प्रगतिशील योजना निवडल्याचे ट्रुडो यांनी समर्थकांना संबोधित करताना म्हटले आहे.