मूळचे पाकिस्तानी होते कुटुंब- इस्लामोफोबियावरून ट्रुडो यांच्यावर टीका
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात पाकिस्तानी वंशाच्या मुस्लीम कुटुंबाला जाणूनबुजून चिरडून ठार करण्यात आल्यावर जगभरात तीव्र संताप दिसून येत आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून एकजण मृत्यूशी झुंज देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची निंदा करत पाश्चिमात्य देशांमध्ये इस्लामोफोबिया वाढत चालला असल्याचे म्हटले आहे. मुस्लीम कुटुंबाच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोही निशाण्यावर आले आहेत.
कुटुंब मुस्लीम असल्याने ट्रकचालकाने त्यांना लक्ष्य केले होते. ही घटना ओंटारियो शहरात रविवारी रात्री घडली आहे. घटनेनंतर मॉलनजीकच्या परिसरातून एका युवकाला अटक करण्यात आली आहे. ट्रकने एका वळणावर संबंधित कुटुंबाला चिरडले होते. मुस्लिमांच्या विरोधात सामूहिक हत्येचे हे प्रकरण आहे. वांशिक द्वेषामुळेच आरोपीने हे कृत्य केल्याचे शहराचे महापौर एड होल्डर यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन नागरिक सलमान अफजल (46 वर्षे), त्यांची पत्नी मदीहा (44 वर्षे), त्यांची मुलगी यूमना (15 वर्षे) आणि 74 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव फैयाज असल्याचे सांगण्यात आले. वंशद्वेष आणि इस्लामविरोधातील घृणा रोखण्यासाठी लोकांनी उभे रहावे असे संबंधित कुटुंबाच्या नातलगांनी म्हटले आहे. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित परिसरातील अन्य पुरावे जमविण्याचे कार्य हाती घेतले आहे.
या घृणास्पद आणि क्रूर हल्ल्यानंतर शहराच्या महापौरांशी चर्चा केली आहे. इस्लामोफोबियाच्या विरोधात युद्धासाठी प्रत्येक साधनाचा वापर सुरूच ठेवणार आहोत. देशभरातील मुस्लिमांसोबत आम्ही उभे आहोत. आमच्या समाजात इस्लामोफोबियाला कुठलेच स्थान नसल्याचे ट्रुडो यांनी म्हटले आहे.