जस्टिन ट्रुडो यांच्या विजय अवघड, सर्वेक्षणात त्यांचा पक्ष पिछाडीवर , अनेक मुद्दय़ांवर लोक नाराज
@ वृत्तसंस्था / टोरंटो
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 15 ऑगस्ट रोजी मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती. कोरोना संकट योग्यप्रकारे हाताळल्याने पूर्ण बहुमत मिळणार असा विश्वास त्यांना होता. पण आता मतदानाला 5 दिवस शिल्लक असताना त्यांचा हा विश्वास डळमळीत होताना दिसून येत आहे. ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीचा प्रचार प्रभावी होत नसून लोक अनेक मुद्दय़ांवर नाराज आहेत. याचा फटका ट्रुडो यांना निवडणुकीत बसू शकतो.
जस्टिन ट्रुडो हे 2015 पासून सत्तेवर आहेत. 2019 मध्ये दुसऱयांदा पंतप्रधान झाले असता त्यांचे सरकार अल्पमतात होते. याचमुळे त्यांना महत्त्वाची विधेयके संमत करविणे किंवा निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षांची मदत घ्यावी लागत होती. कोरोना संकट त्यांच्या सरकारने चांगल्याप्रकारे हाताळले, लसीकरणात यश मिळाले आणि उद्योगव्यवस्यायांना योग्य मदत करण्यात आली. तरीही सर्वसामान्यांमध्ये ट्रुडो सरकारबद्दल संताप आहे. यामागे सत्ताविरोधी भावना देखील आहे. पूर्ण बहुमतासाठी 49 वर्षीय ट्रुडो यांना 38 टक्के मते मिळवावी लागतील, पण हा आकडा प्राप्त होणे अवघड दिसून येत आहे.
मध्यावधी निवडणुकीचा निर्णय
मध्यावधी निवडणुकीचा निर्णय घेऊन पंतप्रधानांनी चूक केल्याचे ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीच्या एका नेत्याने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये निवडणुकीच्या घोषणेवेळी ट्रुडो यांची लिबरल पार्टी मुख्य विरोधी पक्ष कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीपेक्षा आघाडीवर होती. पण नव्या सर्वेक्षणात ट्रुडो मागे पडत असल्याचे दिसून आले.
कुठे चुकले ट्रुडो?
लवकर निवडणूक घेण्याचे कारण सांगू शकले नाहीत
विरोधी पक्षांनी प्रायव्हेर हेल्थकेअरचा मुद्दा लावून धरला
ओटावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
सत्ताविरोधी भावना ट्रुडो समजू शकले नाहीत
प्रचारमोहिमेत अडचणी
लोक ट्रुडो यांचे भाषण ऐकणे लोक पसंत करायचे, पण ट्रुडो ब्रँडपासून लोक थकले आहेत. आमचे गुलाब कोमेजत आहे. ओंटेरियो सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असून तेथील 121 पैकी 75 जागा लिबरल पार्टीकडे आहेत. पण आता इतक्या जागा प्राप्त करणे अत्यंत अवघड वाटत आहे. मतदार आमचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत असे ट्रुडो यांच्या एका समर्थकाने म्हटले आहे. पहिल्यांदा सत्तेवर आल्यावर ट्रुडो यांनी हवामान बदल, महिलांचे अधिकार वाढविणे आणि आदिवासींना सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते, पण या तिन्ही मुद्दय़ांवर ट्रुडो अपयशी ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
निवडणुकीत काय घडणार?
3 आठवडय़ांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ट्रुडो यांची कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी आघाडीवर असल्याचे म्हटले गेले होते. तर मागील आठवडय़ातील सर्वेक्षणात लिबरल पार्टी किंचित आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. नेनोस पोल्सनुसार मागील आठवडय़ात लिबरल्सना 33.2 टक्के तर कॉन्झर्व्हेटिव्ह्सना 30.2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ट्रुडो आता प्रचारमोहिमेत सेलिब्रिटींची मदत घेत आहेत.
कॅनडाच्या निवडणुकीची वैशिष्टय़े
देशात संसदीय लोकशाही आहे
दर 4 वर्षांनी होते निवडणूक
ब्रिटनच्या महाराणी किंवा राजाचा प्रतिनिधी असतो
या प्रतिनिधीला गव्हर्नर जनरल म्हटले जाते
भारतीय वंशाच्या लोकांवर प्रभाव
कॅनडाच्या एकूण लोकसंख्येत सुमारे 16 लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. यातील सुमारे 5 लाख शीखधर्मीय आहेत. देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या एनडीपीचे नेत जगमीत सिंह आहेत. अल्पमतातील ट्रुडो सरकारला त्यांना काहीवेळा मदत केली आहे. याचमुळे त्यांना जस्टिन सिंह देखील म्हटले जाते. खलिस्तान समर्थकांबद्दल ट्रुडो यांची भूमिका नरमाईची राहिली आहे.