निविदा भरण्यासाठी महापालिकेकडून दहा दिवसांचा अवधी
प्रतिनिधी /बेळगाव
जाहिरात फलकाच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळतो. पण जाहिरात फलकाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाचा महसूल बुडाला आहे. सध्या केवळ गॅन्ट्रीग्ज आणि कॅन्टिलिव्हरच्या माध्यमातून मनपाला महसूल मिळत आहे. त्यामुळे 4 गॅन्ट्रीग्ज आणि 20 कॅन्टिलिव्हरवर जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाने निविदा काढल्या आहेत. निविदा भरण्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
मनपाच्या महसूल उत्पन्नाच्या स्त्राsतापैकी जाहिरात फलक हे महत्त्वाचे स्त्राsत आहे. पण प्लास्टिक बंदी अंतर्गत मध्यंतरी फ्लेक्सचे जाहिरात फलक लावण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच भरमसाट अटी लादण्यात आल्यामुळे जाहिरात फलक निविदा प्रक्रियेत कोणीच भाग घेतला नाही. जाहिरात फलक शुल्क आकारणीसाठी आतापर्यंत अनेकवेळा निविदा मागविण्यात आल्या. पण निविदा प्रक्रियेत कोणीच सहभाग घेतला नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. पण शहरात ठिकठिकाणी चार गॅन्ट्रीग्ज आणि 20 कॅन्टिलिव्हर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे जाहिरात लावण्यासाठी सदर गॅन्ट्रीग्ज आणि कॅन्टिलिव्हर भाडेतत्त्वावर देण्यात येतात. महापालिकेला या माध्यमातून वर्षाला साडेपाच लाखाचा महसूल मिळतो.
या जाहिरात फलकाच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने निविदा मागविण्यात आली आहे. पण निविदा भरण्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दि. 14 एप्रिल अंतिम मुदत असून दि. 19 रोजी बोली लागणार आहे. 4 गॅन्ट्रीग्जवर जाहिराती लावण्यासाठी 1 लाख 49 हजार 300 रुपये दर निश्चित केला आहे. तसेच 20 कॅन्टिलिव्हरवर जाहिराती लावण्यासाठी 3 लाख 73 हजार 240 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या रकमेवर बोली लागणार आहे.