प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या अजेंडय़ावर विविध विषयांसह ओल्ड ग्रँट बंगल्यातील अनधिकृत बांधकामाच्या सर्व्हेक्षणाचा मुद्दा घेण्यात आला आहे. त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्मयता आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड गँट बंगले हस्तांतर करून घेण्याचा प्रयत्न 2016 मध्ये झाला होता. 14 बंगले हस्तांतरण करून घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रयत्न चालविले होते. मात्र बंगलेधारक असोसिएशनच्या वतीने हस्तांतर प्रक्रियेला जोरदार विरोध केल्यानंतर ही कारवाई थांबली होती. मात्र आता पुन्हा ओल्ड ग्रँट बंगल्याचे अनधिकृत बांधकाम सर्वेक्षणाच्या नावाखाली बंगले हस्तांतर करून घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने हालचाली चालविल्या आहेत. सदर विषय मागील बैठकीच्या पुरवणी विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता. मात्र याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे सांगून कॅन्टोन्मेंट सदस्यांनी विषयावर चर्चा करण्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे या विषयावर बैठकीत चर्चा झाली नव्हती. पण हा विषय बैठकीच्या मुख्य अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. ओल्ड ग्रँट बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाबाबत माहिती घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता या विषयाला सभागृहात मंजुरी देण्याची गरज आहे. जर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाल्याचे आढळल्यास बंगले घेण्याचा अधिकार संरक्षण खात्याला आहे. त्यामुळे या विषयावर बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्मयता आहे. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱया योजना कॅन्टोन्मेंट हद्दीत राबविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण खात्याच्या वतीने तसेच आरोग्य खात्याच्या वतीने विविध योजना राबविण्यात येणार आहेत. योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी योजना राबविण्याचा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. तसेच गोगटे चौक येथील उद्यानाचा विकास करून सैनिक स्मारक निर्माण करण्याकरीता ना हरकत दाखला देण्याकरिता हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध विषय बैठकीच्या अजेंडय़ावर आहेत.