प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंटच्यावतीने राबविण्यात येणाऱया विविध विकासकामांबाबत चर्चा करून निविदांना मंजुरी देण्यासाठी मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा. सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मतदार यादी तयार करण्याच्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून, याकरिता प्रशासकांची मंजुरी गरजेची आहे. अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्याला आयोजित करून विकास कामे व अन्य समस्यांबाबत चर्चा करण्यात येते. दि. 8 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अजेंडय़ावर 12 विषय असून, यापैकी विकास कामाबाबत अधिक विषय आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून वर्ष झाले पण अद्याप निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. आगामी काळात कोणत्याही क्षणी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्मयता आहे. त्यादृष्टीने तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता प्रशासकीय मंजुरी गरजेची असल्याने या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
मुख्य पोस्ट कार्यालयाकडून 2009 पासून सर्व्हिस कर भरण्यात आला नाही. त्यामुळे 2009 ते 31 मार्च 2022 पर्यंत 1 कोटी 1 लाख 72 हजार सर्व्हिस कर येणे बाकी आहे. यापैकी पोस्ट खात्याने 77 लाख 81 हजार सर्व्हिस कर कॅन्टोन्मेंट बोर्डकडे भरणा केला आहे. तसेच पोस्ट खात्याने दंड-व्याजात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात रेल्वे खात्याच्या अनेक मालमत्ता आहेत. पण रेल्वे खात्यानेदेखील सर्व्हिस चार्ज भरणा केली नाही. त्यामुळे सर्व्हिस चार्ज आकारणी करण्याबाबत चर्चेसाठी हा विषय अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.