निम्म्या पगारासाठीही कर्मचाऱयांना करावी लागणार प्रतीक्षा : निधी नसल्याने वीजबिलही थकले
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. विद्युतबिल, पाणीपट्टी थकली असून आता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खजिन्यात ठणठणाट असल्याने कर्मचाऱयांचे वेतन देण्यासही निधी नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांना निम्मे वेतन देण्यात आले असून उर्वरित वेतन विलंबाने देण्यात येणार असल्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंटला केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. मात्र मागील चार वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी देण्यात आला नाही. त्यामुळे एसएफसी अनुदान व राज्य शासनाकडून मिळणाऱया अनुदानामधून विकासकामे राबविण्यात येत आहेत. वर्षभरात केंद्र शासनाकडून केवळ 15 व्या वित्त आयोग अनुदानातून निधी मंजूर करण्यात आला. अन्य निधी देण्यात आला नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिघडली आहे. विकासकामे राबविण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे निधी उपलब्ध नाही. विद्युतबिल भरण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. मात्र मागील चार वर्षांपासून हे अनुदानदेखील मिळाले नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने सुमारे 3 कोटी विद्युतबिल थकले आहे. तसेच पाणीपुरवठा मंडळाचे 2 कोटीचे बिल शिल्लक आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खजिन्यात ठणठणाट असल्याने आता मनपा कर्मचाऱयांचे वेतन देणेदेखील मुश्कील बनले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयात 210 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पण या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही निधी नाही. लष्कराकडून मिलिटरी कंझर्वन्शी फंड म्हणून निधी देण्यात येतो. मात्र तो निधीही अद्याप मिळाला नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निम्मा पगार करण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांचे वेतन महिना अखेरच्या आत देण्यात येते. मात्र निधी उपलब्ध नसल्याने सध्या निम्म्या पगारावर समाधान मानावे लागणार आहे. कर्मचाऱयांचे निम्मे वेतन विलंबाने देण्यात येणार असल्याची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांना वेतनकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.