प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपल्यानंतर एक वर्षासाठी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. या दरम्यान कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका झाल्या नसल्याने आता प्रशासकीय राजवटीलादेखील 6 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना संरक्षण खात्याने जारी केली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत 5 वर्षे असते मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे लोकनियुक्त सदस्यांना 6 वर्षांचा कालावधी मिळाला होता. 6 महिने प्रमाणे दोनवेळा मुदतवाढ देण्यात आल्याने लोकनियुक्त सभागृह 10 फेब्रुवारी 2021 रोजी बरखास्त करण्यात आले. त्यानंतर एक वर्षासाठी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. स्टेशन कमांडर, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारनियुक्त सदस्यांचा समावेश असलेली त्रिसदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करून कॅन्टोन्मेंटचे कामकाज करण्याची सूचना केली होती. प्रशासकीय अधिकाऱयांचा एक वर्षाचा कालावधी दि. 10 फेब्रुवारी 2022 ला संपणार आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशासकीय समितीचा कार्य कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशन कमांडरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पुढील कालावधीसाठी कार्यरत राहणार असल्याची अधिसूचना संरक्षण खात्याने जाहीर केली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका होऊन 7 वर्षे झाली. लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे उलटली पण अद्यापही निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. कोरोनाच्या प्रसारामुळे निवडणुका प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. प्रशासकीय राजवटीचा कालावधी आणखी 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका कधी होणार असा मुद्दा उपस्थित होत आहे.