संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा : मात्र चांगले काम केलेल्या ब्रिटिश अधिकाऱयांची नावे जैसे थे ठेवण्याचीही सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातही देशभरात पसरलेल्या सर्व 62 छावण्यांमध्ये अनेक रस्ते आणि इमारतींना ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱयांची आहेत. अशा सर्व रस्त्यांना आणि इमारतींना भारतातील शूर सैनिकांची नावे देण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. हे काम लवकरात लवकर व्हावे, परंतु ज्यांनी प्रशंसनीय आणि भारतासाठी काम केले आहे, त्या ब्रिटिश अधिकारी आणि सैनिकांचे नाव तसेच ठेवले पाहिजे हे लक्षात ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
96 व्या संरक्षण संपदा दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्वच्छ कॅन्टोन्मेंट म्हणून दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, डिजीटल क्षेत्रातील कामगिरीसाठी डिफेन्स इस्टेट ऑफीस, सार्वजनिक सेवेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नैनिताल कॅन्टोन्मेंट बोर्ड, जमीन आणि रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी संरक्षण इस्टेट ऑफीस पुणे विभाग यांना उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या श्रेणीत कसौली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल्समध्ये सुधारणा करण्यासाठी, ई-कॅन्टोन्मेंट प्रकल्प राबविण्यासाठी पुरस्कार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, मात्र कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना आज ब्रिटिश अधिकाऱयांची व सैनिकांची नावे असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील ब्रिटिश अधिकारी व सैनिकांच्या नावांऐवजी देशासाठी योगदान दिलेल्या भारतीय अधिकारी व सैनिकांची नावे देण्याची घोषणा केली. पण ज्या ब्रिटिश अधिकाऱयांनी चांगले काम केले आहे, त्यांची नावे जैसे थे ठेवण्याची सूचना संरक्षण खात्याला केली. नामकरण करण्याची जबाबदारी संरक्षण खात्याकडे सोपविली आहे. सध्या ब्रिटिश कायद्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज चालते. त्यामुळे कायद्यात बदल करण्यात येत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत भारतातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांनी 75 जलाशयांच्या पुनर्भरणीसाठी पुढाकार घेतला आहे. डिफेन्स इस्टेट्स भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण, इमारतीची पुनर्बांधणी आणि मालमत्तेचे फ्री होल्डमध्ये रुपांतर करण्याशी संबंधित समस्यांवर काम सुरू आहे. भारतातील 17.98 लाख एकरांवर पसरलेल्या संरक्षण जमिनीच्या सर्वेक्षणात डिफेन्स इस्टेट्सने मोठी झेप घेतली आहे. आता डिफेन्स इस्टेट्स सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अतिक्रमण टाळण्यासाठी संरक्षण भूमीचे संरक्षण करण्यासाठी हद्दनिश्चिती करण्यात येत आहे.