प्रतिनिधी/ बेळगाव
शहराबरोबरच कॅन्टोन्मेंट परिसरात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र मास्क वापरण्याची सूचना करूनही नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या सुचनेनुसार दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात विनामास्क फिरणाऱयांकडून 100 रूपये दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे पत्रक कॅन्टोन्मेंटने प्रसिद्ध केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र शासनाने विविध सूचना आणि नियमावली घालून दिली आहे. पण शहरासह कॅन्टोन्मेंट परिसरातही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करून अडिचशे रूपये दंड वसुल करण्यात येत आहे. पण कॅन्टोन्मेंटकडुन कोणतीच कारवाई होत नसल्याने विशेषत: कॅन्टोन्मेंट परिसरात नागरिक विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे हा मुद्दा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चेला आला होता. कॅन्टोन्मेंट परिसरात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करून अडिचशे रूपये दंड वसुल करण्याचा विचार करण्यात आला होता. पण हा दंड जास्त होत असल्याने विनामास्क फिरणाऱयांकडून 100 रूपये दंड आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यापुढे कॅन्टोन्मेंट देखील विनामास्क फिरणाऱयांकडुन दंड वसुली करणार आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरात विनामास्क फिरल्यास 100 रूपये दंड वसुली करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी तेंडाला मास्क वापरावे तसेच सामाजिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे. जर विनामास्क आढळून आल्यास 100 रूपये दंड वसुल केला जाईल असा इशारा कॅन्टोन्मेंटच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.