प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष निवड आणि कायद्यातील नव्या तरतुदीनंतर देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र, लोकसभेत या विषयावर अद्याप निर्णय झाला नाही. पण निवडणुका घेण्याच्यादृष्टीने संरक्षण खात्याने हालचाली चालविल्या आहेत. याकरिता महिला आणि मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या वॉर्डची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जुलैमध्ये निवडणूक होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे तसेच कॅन्टोन्मेंट कायद्यातील दुरुस्ती प्रस्तावामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. लोकनियुक्त सभागृहाला मुदतवाढ देण्यात आली होती. पण सहा महिन्यांच्या कालावधीत कॅन्टोन्मेंट कायद्यातील दुरुस्ती प्रस्तावाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने कॅन्टोन्मेंट निवडणूक लांबणीवर टाकून लोकनियुक्त सभागृहाला दुसऱयांदा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, ही मुदतवाढ दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी संपुष्टात आली. त्यामुळे सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. जनतेमधून एका सदस्याची निवड करण्यात येते. या पदावर नियुक्ती व्हावी, याकरिता काहींनी संरक्षण मंत्रालयापर्यंत वशिला लावला आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱयांसह संरक्षण मंत्र्यांनाही याची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे लवकर निवडणुका घेण्याचा विचार चालविला आहे. जुलै अखेरपर्यंत देशातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका घेण्याचा विचार संरक्षण खात्याने चालविला आहे.
अन्य सदस्यांबरोबरच उपाध्यक्षांची निवड करून उपाध्यक्षांना विशेष अधिकार देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबतची तरतूद कॅन्टोन्मेंट कायद्यात करण्यात येणार आहे. मात्र, प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली नाही. हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली किंवा नाही मिळाली तरी निवडणुका जुलैमध्ये घेण्याचा विचार आहे, तशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कॅन्टोन्मेंटवासियांना दिली आहे. संरक्षण खात्याने निवडणुकीच्यादृष्टीने राखीव वॉर्डची अधिसूचना जारी केली आहे. देशातील 56 वॉर्डची अधिसूचना संरक्षण खात्याने प्रसिद्ध केली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील वॉर्ड क्रमांक 7 मागासवर्गियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक 4 आणि 6 असे दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव असणार आहेत. उर्वरित 4 वॉर्ड सामान्यांसाठी खुले आहेत. संरक्षण खात्याने वॉर्डची राखीवता जाहीर केली असल्याने मे अखेरपर्यंत कॅन्टोन्मेंट निवडणूक जाहीर होण्याची शक्मयता आहे.