सरकार नियुक्त सदस्यांचा ऑनलाईन बैठकीत ठराव : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची घेणार भेट
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून व्यवस्थित सुविधा मिळत नाहीत. तसेच पेंद्र आणि राज्य शासनाकडून निधी दिला जात नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बाजारपेठेचा समावेश महापालिकेत करावा, असा ठराव कॅन्टोन्मेंट सरकार नियुक्त सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेंटच्या सरकार नियुक्त सदस्यांची ऑनलाईन बैठक नुकतीच झाली. यावेळी चर्चेत 22 कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांनी भाग घेतला होता. बेळगाव कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. देशात 62 कॅन्टोन्मेंट असून कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी निधी मंजूर केला जात नाही. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याबाबतच्या तक्रारी प्रामुख्याने चर्चेवेळी करण्यात आल्या. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बाजारपेठेत नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचा संरक्षण खात्याचा प्रस्ताव आहे. पण याबाबत खुली चर्चा नाही. मात्र या विषयावर सरकार नियुक्त सदस्यांच्या ऑनलाईन बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच नागरी वसाहतीचा समावेश महापालिका हद्दीत करावा असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
तसेच शासनाकडून मंजूर करण्यात येणाऱया निधीची माहिती व्यवस्थित दिली जात नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या निधीचा तपशील घ्यावा. तसेच नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. तसेच कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून नागरिकांना तसेच सरकार नियुक्त सदस्यांना सहकार्य मिळत नसल्याने याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कारभाराबद्दल चर्चा करण्यासह नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.